
रोखठोक मराठी न्यूज
पुणे, (प्रतिनिधी) : चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित सर्व विभागांना येत्या २५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसेच वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पीएमआरडीएचे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख रस्त्यांची पाहणी; अनेक ठिकाणी गंभीर समस्या बैठकीत चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः तळेगाव चौक, राणूबाईमळा, खराबवाडी, वाघजाई नगर–खराबवाडी रोड, महाळुंगे इंगळे, खालुंब्रे, शिंदे वासुली, आंबेठाण वाय कॉर्नर, कोरेगाव फाटा, बिरदवडी फाटा तसेच दवणे मळा ते द्वारका सिटी रोड आणि कॉर्निंग कंपनी ते पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्ग या मार्गांवरील रस्ते अत्यंत खराब झाल्याचे निदर्शनास आले.या भागांमध्ये मोठमोठे खड्डे, खराब झालेले रस्ते आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दररोज अपघातांचा धोका वाढत असल्याची नोंद बैठकीत करण्यात आली.
युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने सर्व खड्डे बुजविणे, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांच्या कडांची सुधारणा करणे तसेच आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेऊन सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने निश्चित मुदतीत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्यचाकण एमआयडीसी परिसरातून दररोज हजारो कामगार, उद्योगांशी संबंधित वाहने आणि अवजड मालवाहतूक होत असल्याने या भागातील रस्त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांच्या जीविताशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी डुडी यांनी रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा संबंधित विभागांना दिला.
२५ ऑगस्ट ही अंतिम मुदतराष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत कामांची नियमित पाहणी केली जाणार असून, कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि विभागांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.