
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी चाकण नगरपरिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. ‘माझी वसुंधरा’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानांतर्गत शहरात १४ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे, तर ३ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक नदी, ओढे किंवा अन्य जलस्त्रोतांमध्ये न करता नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या तीन ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड : नागरिकांना पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करता यावे यासाठी भामा नदी, वाकी; जि. प. प्राथमिक शाळा, राधेवाडी आणि आंबेठाण चौक येथे कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत.१४ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रेशहरातील नागरिकांच्या सोयीसाठी संत सावतामाळी मंदिर, दावडमळा, जि.प. प्राथमिक शाळा झित्राईमळा, जि.प. प्राथमिक शाळा राणूबाई मळा, स्वप्ननगरी येथील गणेश मंदिराजवळ, एकतानगर मित्र मंडळ, श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, श्रीरामनगर येथील श्री गणेश मंदिर, जि.प. प्राथमिक शाळा आगरवाडी, संत सावतामाळी चौक आंबेठाण चौक, संत सावतामाळी मित्र मंडळ माळ आळी, यंग जॉली क्लब-श्री शनी मंदिराजवळ, जि.प. प्राथमिक शाळा मुलांची क्रमांक १, बोल्हाई माता मंदिर भुजबळ आळी आणि श्री गणेश मंदिर मुटकेवाडी येथे मूर्ती संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
निर्माल्य नदीत न टाकण्याचे आवाहन :-गणेशमूर्तीवरील फुले, हार तसेच पूजाविधीनंतरचे निर्माल्य नदीत विसर्जित करून जलप्रदूषण होऊ नये, यासाठी प्रत्येक संकलन केंद्रावर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी निर्माल्य वेगळे करून त्याच कलशात जमा करावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
“निसर्ग वाचवा, गणेशोत्सव साजरा करा!” या संकल्पनेला साथ देत गणेशभक्तांनी श्रद्धा आणि परंपरा जपत पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. जलप्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम विसर्जन कुंड तसेच मूर्ती संकलन केंद्रांचा जास्तीत जास्त वापर करून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव आणि नगराध्यक्षा श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांनी केले आहे.