न्यायालयात साक्षी-पुराव्यांचे सखोल परीक्षण; डॉक्टरांच्या उलट तपासणीसह बचाव पक्षाच्या युक्तिवादाचा ठरला महत्त्वाचा भाग
रोखठोक मराठी न्यूज, जुन्नर : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली सन २०१९ पासून कारागृहात असलेल्या भगवान नारायण रोडे यांची तब्बल सात वर्षांनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, जुन्नर यांनी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. शेलार यांनी खटल्यातील साक्षीदारांची साक्ष, उलटतपासणी, वैद्यकीय व इतर कागदोपत्री पुरावे यांचे सखोल परीक्षण करून हा निकाल दिला.
नारायणगाव पोलीस ठाण्यात सन २०१९ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०१९ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत भगवान नारायण रोडे यांच्याविरुद्ध पत्नी मंदा रोडे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतातील खोलीत आढळले होते पत्नीचा मृतदेह:- पोलिसांच्या तपासानुसार, भगवान रोडे हे पत्नी मंदा रोडे यांच्यासोबत ठुसे यांच्या शेतात काम करून तेथील एका खोलीत राहत होते. घटनेच्या रात्री त्या ठिकाणी भांडणाचा आवाज शेजारील दोन साक्षीदारांनी ऐकल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंदा रोडे यांचा मृतदेह खोलीमध्ये आढळून आला होता.
घटनास्थळी रक्ताचे डाग तसेच मृतदेहावर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपास सुरू केला. तपासी अधिकारी सौ. दिपाली खन्ना यांनी घटनास्थळाचे पंचनामे तसेच अन्य आवश्यक तपासणी करून विविध पुरावे संकलित केले.आरोपीचा शोध घेऊन अटक तपासा दरम्यान आरोपी भगवान रोडे यांचा दूरध्वनी क्रमांकाच्या आधारे शोध घेण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्याच्या वेळी अंगावर असलेले कपडे तसेच वापरलेले हत्यार लपवून ठेवल्याचे आरोपीने सांगितल्यानंतर सरकारी पंचांच्या उपस्थितीत संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.या प्रकरणात पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी व इतर साक्षीदार, वैद्यकीय पुरावे, एफएसएल अहवाल, डीएनए रिपोर्ट तसेच विविध कागदोपत्री पुरावे संकलित करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
राजगुरूनगर नंतर जुन्नर न्यायालयात खटला :- या प्रकरणाचा खटला सुरुवातीला राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. त्यानंतर जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. शेलार यांच्यासमोर चालवण्यात आला.सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पाच साक्षीदारांची उलटतपासणी आरोपीच्या वतीने करण्यात आली. बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती, पुराव्यांची विश्वासार्हता आणि तपासातील विविध बाबींवर न्यायालयाचे लक्ष वेधले.डॉक्टरांच्या उलटतपासणीला विशेष महत्त्वखटल्याच्या सुनावणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टरांची साक्ष आणि त्यावरील उलटतपासणी हा बचाव पक्षासाठी महत्त्वाचा भाग ठरला. डॉक्टरांच्या साक्षीचे न्यायालयाने सखोल परीक्षण केले. तसेच इतर साक्षीदारांच्या सरतपास आणि उलट तपासातील बाबींचाही न्यायालयाने बारकाईने विचार केला.हत्यार व कपडे जप्त केल्याच्या पंचनाम्यातील पंच साक्षीदारांचा उलटतपास बचाव पक्षाकडून घेण्यात आला नसल्याची बाबही या प्रकरणातील कार्यवाहीचा भाग होती.न्यायालयाने प्रत्येक पुराव्याचे केले सखोल परीक्षणदोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. शेलार यांनी खटल्यातील संपूर्ण पुराव्याचे परीक्षण केले.
प्रत्येक साक्षीदाराच्या तपासासोबतच उलटतपासामध्ये समोर आलेल्या बाबींचा न्याय निर्वाळ्यात सविस्तर विचार करण्यात आला.विशेषतः वैद्यकीय साक्षीदाराच्या उलट तपासणीमधून समोर आलेल्या बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी भगवान नारायण रोडे यांना दोषमुक्त करण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार २५ हजार रुपयांच्या जामीनदारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.सात वर्षांच्या कारावासानंतर सुटकाया प्रकरणात भगवान रोडे हे सलग सुमारे सात वर्षे तुरुंगात होते. न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, त्यांना झालेल्या दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून नुकसानभरपाईसाठी दावा करण्यास ते पात्र असल्याचे नमूद करण्यात आले.या निर्णयामुळे सात वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला.बचाव पक्षाच्या वतीने प्रभावी युक्तिवाद आरोपी भगवान नारायण रोडे यांच्या वतीने अॅड. सुशांत तायडे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांच्या साक्षींचे परीक्षण, उलट तपासणी आणि अंतिम युक्तिवादादरम्यान आरोपीच्या बाजूने प्रभावीपणे मांडणी केली. त्यांच्या युक्तिवादासह खटल्यातील संपूर्ण पुराव्याचे न्यायालयाने केलेले परीक्षण आरोपीच्या निर्दोष मुक्ततेच्या निकालात महत्त्वाचे ठरले.अॅड. सुशांत तायडे यांना अॅड. विनया जगनाडे, अॅड. प्रज्ञा कांबळे, अॅड. शुभांगी देवकुळे, अॅड. अक्षय घोलप, अॅड. सुजित पाडवी, अॅड. भूमीन कुमावत, अॅड. चिन्मयी बोरकर, अॅड. देवेन पगाडे आणि अॅड. आर्यमन जयबहार यांनी सहकार्य केले.जलद न्यायनिवाड्याबद्दल न्यायालयाचे कौतुकभारतीय संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार असून, त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया अनावश्यकपणे लांबू नये, या तत्त्वालाही महत्त्व आहे.
सदर प्रकरणात आरोपी तब्बल सात वर्षे कारागृहात असल्याच्या पार्श्वभूमीवर खटला चालवून त्याचा निकाल देण्यात आला.साक्षीदारांच्या साक्षींचे बारकाईने परीक्षण, उलटतपासणीतील बाबींचा विचार आणि उपलब्ध पुराव्यांचे विश्लेषण करून निकाल देण्यात आल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. शेलार यांच्या न्यायालयीन कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.या निकालामुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या या खटल्याचा शेवट झाला असून, निर्दोष मुक्त झालेल्या भगवान रोडे यांच्यासाठी सात वर्षांनंतर स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला आहे.