भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेला ताब्यात एटीबीची भोसरी परिसरात कारवाई; बांगलादेशात हद्दपारीची प्रक्रिया सुरू

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी

१९ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATB) भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याचा संशय असलेल्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संबंधित महिलेने बनावट आधारकार्डाच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना १८ सप्टेंबर रोजी गोविंद गार्डन परिसरात एक बांगलादेशी महिला अनधिकृतपणे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीबीच्या पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी डायमंड लॉज येथे लवली रोविंदर जाट या नावाने राहणारी महिला आढळून आली.पोलिसांनी तिच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली असता आधारकार्ड बनावट असल्याचे आढळले. चौकशी दरम्यान तिने आपले बांगलादेशातील नाव लवली मो. अबु बकर सिद्दीक शेख (वय २९) असून, ती बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेने सुमारे दोन वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे चौकशीत सांगितले.

सध्या ती मध्य प्रदेशातील इंदूर येथे रोविंदर जाट नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याचेही समोर आले. तसेच फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ती बांगलादेशातील मुलगा, आई आणि इतर नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.ताब्यात घेतलेल्या महिलेला पुढील कार्यवाहीसाठी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

परकीय नागरिक नोंदणी शाखेच्या माध्यमातून तिच्या बांगलादेशात हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विशेष शाखेकडून त्याबाबतची कार्यवाही केली जात आहे.२६ बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केल्याचा पोलिसांचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या २ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानंतर आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात हद्दपारीची प्रक्रिया राबवली जात आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २ मे २०२५ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एटीबीने एकूण ३० बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी २६ जणांना बांगलादेशात हद्दपार करण्यात आले असून, चार जणांविरुद्ध हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चीचे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *