रोखठोक मराठी न्यूज
चाकण, (प्रतिनिधी ) चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण ४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडल्या. मिरवणुकां दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच विसर्जन मिरवणुका सुरक्षित व सुरळीत पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग योगेश रांजणकर यांच्या नियंत्रणाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला.मिरवणूक मार्गावर ३ पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ७२ पोलीस अंमलदार, १ आरसीपी पथक, १ एसआरपीएफ पथक आणि २० होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मिरवणुकांचे नियोजन व नियंत्रण करत विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडली.विविध गणेश मंडळांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले. नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.