
रोखठोक मराठी न्यूज चाकण (प्रतिनिधी ) : खेड तालुक्यातील खराबवाडी येथील गायरान जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमणांवर महसूल प्रशासनाने सोमवारी (दि. २७) मोठी कारवाई करत तब्बल ८७ व्यावसायिक अतिक्रमणे हटविली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली असून, दुसऱ्या टप्प्यात निवासी अतिक्रमणांवर ३० सप्टेंबरनंतर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
खराबवाडी येथील गायरान गट क्रमांक २/१, २/२ व ४४८ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रावरील व्यावसायिक अतिक्रमणे जेसीबी व पोकलँडच्या साहाय्याने हटविण्यात आली. तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या अतिक्रमणांवर महसूल, ग्रामपंचायत, महावितरण आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सुमारे १५० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी :
गायरान जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम खराबवाडीपासून सुरू केली आहे.नोटीसनंतर अनेकांनी स्वतःच अतिक्रमणे हटविली ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना जाहीर नोटीस देऊन २४ तासांच्या आत अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक नागरिकांनी स्वखर्चाने स्वतःची अतिक्रमणे हटविली. याबद्दल तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी संबंधित नागरिकांचे आभार मानले.
निवासी अतिक्रमणांवर दुसऱ्या टप्प्यात कारवाई
पहिल्या टप्प्यात खराबवाडी आणि गोलेगाव येथील व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. पावसाळा लक्षात घेऊन निवासी अतिक्रमणांवरील कारवाई सध्या स्थगित ठेवण्यात आली असून, ३० सप्टेंबरनंतर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधितांना लवकरच नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.”सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खराबवाडी येथील दोन एकर गायरान क्षेत्रातील ८७ व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मंगळवार (दि. २८) पासून गोलेगाव येथील व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई सुरू होणार आहे.”— प्रशांत बेडसे, तहसीलदार