
रोखठोक मराठी न्यूज
राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर येथील वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ प्राध्यापिका कु. हेमलता श्रीरंग चौधरी यांनी “पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या मसाले व लोणचे उद्योगाच्या व्यवस्थापनाचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर सखोल संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या आणि ग्रामीण तसेच लघुउद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या संशोधनामध्ये पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजकांकडून चालविल्या जाणाऱ्या मसाले व लोणचे उद्योगांच्या व्यवस्थापन पद्धती, आर्थिक नियोजन, विपणन, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, उद्योगासमोरील अडचणी तसेच भविष्यातील संधी यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनातून महिला उद्योजकांच्या उद्योगविकासासाठी उपयुक्त अशा विविध सूचना आणि शिफारशीही मांडण्यात आल्या आहेत.या संशोधन कार्यासाठी वाघीरे महाविद्यालयाच्या वाणिज्य व संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. किशोर लिपारे तसेच साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संशोधनाला शास्त्रीय दिशा मिळाल्याचे कु. चौधरी यांनी नमूद केले.
पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. गणेश धुमाळ, एमबीए विभागाच्या प्रभारी संचालिका डॉ. पायल ओसवाल, वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कु. चौधरी यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महिला उद्योजकता, विशेषतः मसाले आणि लोणचे उद्योगाच्या व्यवस्थापनावर केंद्रित असलेले हे संशोधन उद्योग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणारे असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. या संशोधनामुळे महिला उद्योजकांना उद्योग व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करता येईल, त्यांच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी नवे मार्ग उपलब्ध होतील तसेच स्थानिक स्तरावरील महिला उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.