एक महिन्याचे वीज बिल थकल्याने मीटर काढले; बिल भरताच गुपचूप डिजिटल मीटर बसवल्याचा आरोप

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण ( प्रतिनिधी ) नाणेकरवाडी (चाकण ) येथील रहिवासी संगीता कुमार दाभाडे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. केवळ एक महिन्याचे वीज बिल थकल्याच्या कारणावरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरातील वीज मीटर काढून नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी तत्काळ संपूर्ण थकीत वीज बिल भरले. मात्र, बिल भरल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्राहकाची संमती न घेता त्यांच्या घरात डिजिटल वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संगीता दाभाडे यांच्या म्हणण्यानुसार, बिल भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु काही वेळातच महावितरणचे कर्मचारी घरासमोर आले आणि कोणतीही माहिती न देता डिजिटल मीटर बसवून निघून गेले. मीटर बदलण्यामागचे कारण किंवा त्याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे.याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी “ऑफिसमध्ये येऊन बोला” असे सांगत अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्राहकांशी उद्धट व असभ्य वर्तन केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वीज वितरण करणाऱ्या शासकीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सन्मानाने व पारदर्शक पद्धतीने संवाद साधणे अपेक्षित आहे. मीटर बदलण्यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेपूर्वी ग्राहकाला योग्य माहिती देणे आवश्यक असताना, तसे न करता थेट डिजिटल मीटर बसविण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वर्तनाची दखल घ्यावी, तसेच मीटर बदलण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली का याचीही तपासणी करावी, अशी मागणी संगीता दाभाडे यांनी केली आहे. यासोबतच भविष्यात अशा प्रकारे ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी महावितरणने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, या आरोपांबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *