ज्ञानदानाच्या सेवेला सलाम; मुख्याध्यापिका हेमलता देशमुख यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखर क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका हेमलता बाळासाहेब देशमुख यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेचा गौरव करणारा सेवापूर्ती सत्कार समारंभ चाकण येथील श्रेया लॉन्स येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई गोरे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी हेमलता देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या ज्ञानदानाची आणि समर्पित सेवाभावाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जपलेली परंपरा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.सेवापूर्तीच्या निमित्ताने हेमलता देशमुख यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपये किंमतीची बालोद्यानातील खेळणी भेट देत मुलांसाठी आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचा उपक्रम राबविला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी बोअरवेलमध्ये पाण्याची मोटार बसवून महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक साहेबराव कड, मंगेश कांडगे, अनिल लोहकरे, आकाश जाधव, श्याम राक्षे, केंद्रप्रमुख सुनील रायकर, निवृत्त पोलीस अधिकारी गाडे साहेब, गटविकास अधिकारी (बीडीओ) सुर्वे साहेब, तसेच देशमुख परिवारातील आप्तेष्ट, नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने झाली. मनीषा कुंभार व नीलिमा मांडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाटेकर आणि नारायण करपे यांनी केले, तर प्रभाकर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन बाळासाहेब देशमुख यांनी केले. सेवापूर्तीचा हा सोहळा हेमलता देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करणारा आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *