
रोखठोक मराठी न्यूज
राजगुरुनगर : ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे कोहिंडे बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून कुमंडला नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. नदी व ओढ्यालगतची सुपीक शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.महापुराच्या तडाख्यामुळे गावातील अनेक भातखाचरे पूर्णपणे वाहून गेली असून शेतजमिनींचे बांध फुटल्याने मोठ्या प्रमाणात मातीचे धूप होऊन शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे.


अनेक ठिकाणी पिकांसह शेतीची संरचनाच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना नव्याने शेती उभी करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.दरम्यान, ढगे पिंगळे वस्ती येथील पुलाजवळील रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कंदवस्ती परिसरात ओढ्याने प्रवाह बदलल्याने तेथील विहिरी, भातखाचरे आणि शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक बदललेल्या प्रवाहामुळे शेतीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून अनेक ठिकाणी शेती उपयोगात आणण्यासाठी पुन्हा मोठा खर्च करावा लागणार आहे.याचबरोबर, विकास कचाटे यांच्या सैनिक दूध डेअरीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. डेअरीमध्ये साठवून ठेवलेले पशुखाद्य पाण्यात भिजून निकामी झाले असून डेअरी परिसरात चिखल व गाळ साचला आहे. तसेच रोकड आणि दुधाच्या कॅन्स पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
एकूणच, ढगफुटी सदृश पावसामुळे कोहिंडे बुद्रुक गावासह परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, नुकसानग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि शेती पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.