चाकणमध्ये अतिवृष्टीचा कहर; व्यापारी, दुकानदार व लघुउद्योजकांच्या नुकसानभरपाईसाठी तातडीच्या पंचनाम्याची मागणी.

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण, (प्रतिनिधी ) : चाकण शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने व्यापारी, दुकानदार आणि लघुउद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लाखो रुपयांचा माल, यंत्रसामग्री, संगणक, इलेक्ट्रिकल साहित्य, फर्निचर तसेच इतर व्यावसायिक मालमत्ता पाण्याखाली गेली. परिणामी अनेक व्यवसायांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून व्यापाऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर बाधित व्यापाऱ्यांचा तातडीने पंचनामा करून शासनाकडे नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठविण्याची तसेच शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीची चौकशी करण्याची जोरदार मागणी खेड तालुका चाकण मंडल भाजपाध्यक्ष भगवान मेदनकर यांनी चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.

यावेळी प्रवीण करपे, अर्जुन बोराडे, दत्ता परदेशी,अजय जगनाडे, मंगेश देसाई, ज्ञानेश्वर बढे, श्रीकांत परदेशी उपस्थित होते.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पर्जन्यजल निचरा आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात विक्रमी पावसानंतर शहरातील अनेक प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि व्यापारी संकुले पाण्याखाली गेली. त्यामुळे खर्च झाल्यानंतरही अशी परिस्थिती का निर्माण झाली, याबाबत नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

या संदर्भात प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महसूल विभागाच्या समन्वयाने शहरातील सर्व बाधित व्यापारी, दुकानदार आणि लघुउद्योजकांचा तातडीने पंचनामा करणे, प्रत्येक व्यापाऱ्याच्या नुकसानीचा स्वतंत्र अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाकडे विशेष आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठविणे, तसेच नगरपरिषदेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे ठराव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, नालेसफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार किंवा दोषी व्यक्तींवर नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शहरातील सर्व पूरग्रस्त भागांचे संयुक्त सर्वेक्षण करून कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा जाहीर करावा, बाधित व्यापाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी तसेच संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.चाकण हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने येथील व्यापाऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करणे योग्य ठरणार नाही, असे व्यापारी संघटनांचे मत आहे.

पूरामुळे अनेक लघुउद्योजक आणि किरकोळ व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने शासनाच्या मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा व्यापारी संघटना, नागरिक आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *