मुसळधार पावसाने चाकण नगर परिषदेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल; अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिक त्रस्त

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण, ( कल्पेश अ. भोई ) : पावसाळ्यापूर्वी चाकण नगर परिषदेकडून शहरातील नाले, गटारे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसाने या दाव्याची वास्तवस्थिती समोर आणली.

अवघ्या काही तासांच्या पावसात शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने नगर परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे मुख्य रस्ते, अंतर्गत गल्लीबोळ तसेच काही चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली, तर पादचाऱ्यांनाही पाण्यातून मार्ग काढावा लागला.

काही ठिकाणी गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आले आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईवर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नाले पूर्ण क्षमतेने स्वच्छ झाले होते का, की केवळ वरवरची साफसफाई करण्यात आली होती, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अनेक ठिकाणी प्लास्टिक, गाळ आणि कचरा वाहून येऊन नाले पुन्हा तुंबल्याचेही दिसून आले.स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत, केवळ कागदोपत्री नालेसफाई करून उपयोग नसून प्रत्यक्ष परिणाम दिसणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता, देखरेख आणि संबंधित कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी घरांच्या अंगणापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला. प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

आजच्या पावसाने एक गोष्ट स्पष्ट केली की, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर चाकणला अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था उभारण्याची गरज आहे. केवळ नालेसफाईचे दावे करून चालणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांना जाणवला पाहिजे. अन्यथा प्रत्येक मुसळधार पावसानंतर चाकणकरांना पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि गैरसोयींचा सामना करावा लागणार, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *