साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

प्रथम वर्ष कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात.

रोखठोक मराठी न्यूज, राजगुरुनगर : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष कला व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देतानाच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात आनंददायी वातावरणात व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष आमदार बाबाजी काळे आणि सचिव नानासाहेब टाकळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब सांडभोर होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयात मोलाचे मार्गदर्शन केले जाते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

”यावेळी अॅड. बाळासाहेब लिंभोरे यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेमागील सामाजिक व शैक्षणिक उद्देशाची माहिती दिली. ते म्हणाले की, शरद पवारसाहेब यांचे निकटचे सहकारी असलेले खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माजी आमदार साहेबरावजी बुट्टेपाटील यांनी विधिमंडळात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने त्यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्या कार्याचा गौरव करताना लिंभोरे यांनी चास-कमान धरणाच्या उभारणीमुळे खेड व शिरूर तालुक्यात झालेल्या कृषी विकासाचाही उल्लेख केला. चास-कमान धरणामुळे परिसरातील शेतीला पाण्याची उपलब्धता वाढून खेड व शिरूर तालुक्यात हरितक्रांतीला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विशाल थिगळे, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, प्राचार्या डॉ. शिल्पा जगताप,प्रा. शशिकांत बुरुड प्रा. डॉ.तुषार वेहळे, प्रा. आरती इंदाईस, प्रा.हर्षदा कोळीयांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जी. जी. आहेरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बडे आणि प्रा. निकिता कारले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल कालेकर यांनी मानले.

स्वागत समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमातप्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे कलागुणांचे सादरीकरण आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह यामुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.या कार्यक्रमामुळे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन वातावरणाशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक आणि उत्साहपूर्ण सुरुवात या स्वागत समारंभातून झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *