
५० हजार रुपये किंमतीचे पिस्तूल जप्त; शस्त्र पुरवठ्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
रोखठोक मराठी न्यूज
पिंपरी-चिंचवड, ( प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत ५० हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी पिस्तूल जप्त केले आहे. या प्रकरणी यश अनिल शिंदे (वय २२) आणि प्रज्वल सुधीर जाधव (वय २२) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, शस्त्र पुरवठ्याप्रकरणी फारूख अन्सार पठाण (वय २५) याच्यासह तिघांविरुद्ध दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणीविरोधी पथकातील पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदिप गंगावणे यांना रेकॉर्डवरील आरोपी यश शिंदे आणि प्रज्वल जाधव यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता नाणेकरवाडी येथील माऊली पार्कच्या कमानीजवळ, एमआयडीसी रोड परिसरात सापळा रचून यश शिंदे आणि प्रज्वल जाधव यांना ताब्यात घेतले.यावेळी यश शिंदे याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक लोखंडी पिस्तूल जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान यश याने हे पिस्तूल प्रज्वल जाधव याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. तर प्रज्वल याने हे शस्त्र त्याचा मित्र फारूख अन्सार पठाण याने दिल्याचे पोलिसांना सांगितले.या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ताब्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला पुढील तपासासाठी दक्षिण चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींविरुद्ध यापूर्वीही शरीरा विरुद्धचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे तसेच पोलीस अंमलदार अभिमन्यू बनसोडे, चंद्रकांत जाधव, निलेश जाधव आणि संदिप गंगावणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.