चाकण एसटी बसस्थानकातील सुलभ शौचालय सहा महिन्यांपासून बंद; प्रवाशांची गैरसोय

रोखठोक मराठी न्यूज

चाकण ( कल्पेश भोई ) : चाकण येथील एसटी बसस्थानकातील सुलभ शौचालय गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चाकण एसटी बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. ग्रामीण भागासह विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी या बसस्थानकाचा वापर करतात. अशा महत्त्वाच्या बसस्थानकातील शौचालय दीर्घकाळ बंद असल्याने प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना शौचालयासारखी महत्त्वाची सुविधा सहा महिन्यांपासून बंद असणे ही गंभीर बाब आहे.

या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शौचालय बंद असण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता संबंधित एसटी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन सुलभ शौचालय सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. आता संबंधित प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शौचालय पुन्हा सुरू करण्यासाठी कितपत तत्परता दाखवते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *