



रोखठोक मराठी न्यूज,
आळंदी प्रतिनिधी (आफरीनशेख, दिवेआगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत आठ कोवळ्या जीवांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आळंदी परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे. या घटनेने आळंदी, चऱ्होली खुर्द, केळगाव आणि परिसरातील नागरिक अक्षरशः हादरले असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आळंदीकरांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळला.दिवसभर आळंदी शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि विविध आस्थापने बंद होती. रस्त्यांवर नेहमीची वर्दळ दिसून आली नाही. संपूर्ण शहरात एक प्रकारची भयाण शांतता आणि दुःखाचे वातावरण जाणवत होते. आठ निष्पाप जीवांच्या मृत्यूने नागरिकांच्या मनाला मोठा धक्का बसला असून, प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात आपणही सहभागी आहोत, अशी भावना आळंदीकरांनी या बंदच्या माध्यमातून व्यक्त केली.
आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा : या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश आणि अश्रूंचा बांध फुटलेला पाहून उपस्थित प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले. हातातोंडाशी आलेली लेकरं काळाने हिरावून नेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एका पाठोपाठ एक होणाऱ्या अंत्यविधींमुळे परिसरातील वातावरण अधिकच शोकाकुल झाले होते. आकाशच फाटल्याचा भास व्हावा, अशा परिस्थितीत नागरिक अंत्यविधींना उपस्थित राहून कुटुंबीयांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करत होते.
आळंदीकरांचा अभूतपूर्व स्वयंस्फूर्त बंद : या घटनेच्या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांसोबत उभे राहण्यासाठी आळंदीकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली.हॉटेल व्यावसायिकांनीही या दुःखात सहभाग नोंदवत व्यवसाय बंद ठेवला.
“आम्हीही आई-वडील आहोत; : या कुटुंबांचे दुःख आम्हालाही समजते,” अशी अबोल भावना या बंदमधून व्यक्त होत असल्याचे नागरिक सांगत होते.
प्रत्येक अंत्यविधीला पोलिसांची उपस्थिती या संपूर्ण काळात आळंदी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक अंत्यविधीच्या वेळी उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके हे आपल्या पथकासह स्मशानभूमीत उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवताना दिसले.दुःखाचे वातावरण असतानाही पोलिसांनी संयम राखत कर्तव्य बजावले. प्रत्येक अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून त्यांनी कुटुंबीयांना आणि नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले.
प्रशासन, संस्थान आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती: आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ अंत्यविधीच्या वेळी उपस्थित होते.एका पाठोपाठ एक येणाऱ्या शवयात्रा आणि त्यानंतर होणारे अंत्यसंस्कार पाहताना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. “ही घटना आपल्या घरातीलच घडली आहे,” या भावनेने अनेक आळंदीकरांनी संपूर्ण दिवस स्मशानभूमीत उपस्थित राहून कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग घेतला.
मित्रांना वाचवताना सुमितचा दुर्दैवी अंत दरम्यान, या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सुमित भरत अहिरे हा आपल्या मित्रांना समुद्रात बुडताना पाहून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात समुद्राच्या लाटांमध्ये गेला होता. सुमितला पोहता येत नसतानाही मित्रांचा जीव वाचवण्यासाठी त्याने केलेला प्रयत्न अखेर दुर्दैवी ठरला.मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात सुमितचाही जीव गेला. त्याच्या या प्रयत्नाने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.शैक्षणिक संस्थेवरील कारवाईनंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचीही चिंताया घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेकडून संबंधित खाजगी शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईचा परिणाम इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर होऊ नये, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.घटनेची जबाबदारी निश्चित करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.’शब्द अपुरे पडावेत’ अशी परिस्थितीआळंदी, चऱ्होली खुर्द आणि केळगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दुःखाचे वातावरण आहे. प्रत्येक घरातून या घटनेचीच चर्चा होत असून, “अशी दुर्दैवी घटना पुन्हा कोणत्याही कुटुंबावर ओढवू नये,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
माऊलींच्या नगरीत झालेल्या या स्वयंस्फूर्त बंदमधून आळंदीकरांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती आपली संवेदना व्यक्त केली आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे आणि दिवेआगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व कोवळ्या जीवांना सद्गती लाभावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे.ऐन तारुण्यात आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या या कोवळ्या जीवांचा असा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे.
या दुर्घटनेतील सर्व मृतांना आमच्या “रोखठोक मराठी न्यूज” टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
