रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी २४ तासांत जेरबंद

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात

रोखठोक मराठी न्यूज

चाकण (प्रतिनिधी ) रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत टोळीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. या प्रकरणी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख (वय २६) आणि शेखर बापू माने (वय २१) या दोघांना अटक करण्यात आली असून, एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय चिंतामन देसलेपाटील (वय २९) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत एमएआरजे टेक्ने प्लास्ट कंपनीसमोरील निघोजे-तळवडे ब्रिज रोड परिसरातून रिक्षाने जात होते. त्यावेळी रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी संगनमत करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. दमदाटी करून त्यांच्या पॅन्ट व शर्टच्या खिशातील ११ हजार ४७० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले.या घटनेप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ७८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपींबाबत कोणताही ठोस सुगावा नसतानाही पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून रिक्षाचा क्रमांक मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी २४ तासांच्या आत अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख आणि शेखर बापू माने यांना ताब्यात घेतले.चौकशीत दोघांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अमन ऊर्फ शाहबाज समीर शेख हा निगडी पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणात अटकेत होता. सुमारे १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच शेखर बापू माने याच्यावरही जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवड, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये, पोलीस हवालदार चेतन सावंत तसेच पोलीस शिपाई राजेंद्र खेडकर, प्रविण बांबळे, शिवाजी मरकड, राजेश गिरी, आकाश घाडगे आणि राजकुमार हणमंते यांच्या पथकाने ही कारवाई केली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पिंजारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *