निशा साबळे यांचा ‘आयकॉन ऑफ उलगुलान’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान

Spread the love

रोकठोक मराठी न्यूज

नवी दिल्ली : आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय संघर्ष संमेलनात SFI महाराष्ट्र राज्य सहसचिव, विद्यार्थी चळवळीतील लढाऊ झेन-जी नेतृत्व, अभ्यासू व झुंजार कार्यकर्त्या साथी निशा साबळे यांना ‘आयकॉन ऑफ उलगुलान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निशा साबळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमात त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधले होते.

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या राष्ट्रीय संघर्ष संमेलनासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या प्रतिनिधी मंडळात निशा साबळे यांचा समावेश आहे. संमेलनात आदिवासी शिक्षणाच्या ठरावावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी वास्तववादी व अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत आपले मनोगत व्यक्त केले.आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार आणि जल-जंगल-जमिनीचे प्रश्न यासाठी सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका निशा साबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि त्यासाठीचा लढा या दोन्हींची सांगड घालत त्या विद्यार्थी चळवळीतील प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.“आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगाराच्या समान संधी आणि आपल्या जल, जंगल व जमिनीवरील अधिकार मिळवून देण्यासाठीचा संघर्ष अधिक व्यापक करण्याची गरज आहे. हा लढा यापुढेही अधिक ताकदीने पुढे नेऊ,” असा निर्धार निशा साबळे यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या राष्ट्रीय संघर्ष संमेलनात महाराष्ट्रातून डॉ. अमोल वाघमारे, राजु घोडे, राजु शेळके, अविनाश गवारी आणि निशा साबळे यांच्यासह महाराष्ट्राचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.निशा साबळे यांना मिळालेल्या ‘आयकॉन ऑफ उलगुलान’ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *