
(प्रतिनिधिक फोटो )
चाकण परिसरात बंद पडणाऱ्या अवजड वाहनांना तातडीने बाजूला करण्याची सुविधा; लवकरच रुग्णवाहिकाही ताफ्यात दाखल होणार
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर चाकण परिसरात अवजड वाहने बंद पडल्यामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आता तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चाकणसाठी एक क्रेन आणि पेट्रोलिंग व्हॅन सेवेत दाखल केली आहे. त्यामुळे महामार्गावर बंद पडणाऱ्या अवजड वाहनांना तत्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे.चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि महामार्गावर वारंवार बंद पडणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अडचणींबाबत चाकण वाहतूक पोलिस तसेच चाकण कृती समितीच्या वतीने NHAIकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. अवजड वाहन बंद पडल्यानंतर ते पोलिसांकडून धक्का देऊन बाजूला करणे शक्य नसल्याने अनेकदा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत.ही समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार NHAIकडून चाकणसाठी क्रेन आणि पेट्रोलिंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही वाहने महाळुंगे आणि चाकण वाहतूक विभागासाठी स्पायसर चौक येथील NHAIच्या डिव्हिजन ऑफिसमध्ये तैनात असणार आहेत. त्यामुळे अपघात किंवा अवजड वाहन बंद पडल्याची घटना घडल्यास मदतकार्य अधिक वेगाने करता येणार आहे.
लवकरच रुग्णवाहिकाही ताफ्यात
दरम्यान, या सेवेला आणखी बळकटी मिळणार असून लवकरच रुग्णवाहिका ही या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली मान्यता NHAIच्या दिल्ली कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासही मोठी मदत होणार आहे.
MIDC परिसरात सुविधा, मात्र तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग अद्याप वंचित
चाकण औद्योगिक परिसरातील MIDC भागात अशाच प्रकारची क्रेन सेवा आधीपासून कार्यरत आहे. मात्र तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर अद्याप अशी आपत्कालीन क्रेन सुविधा उपलब्ध झालेली नाही. या मार्गावरही अवजड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहन बंद पडणे किंवा अपघात झाल्यास वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करते.त्यामुळे या मार्गासाठी MSIDC अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन क्रेन व पेट्रोलिंगसह आपत्कालीन मदत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी चाकणकरांकडून होत आहे.चाकण परिसरात NHAIने सुरू केलेली ही सुविधा वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, आता ही यंत्रणा प्रभावीपणे आणि २४ तास कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.