
भर चौकात शेजारी-शेजारी बस उभ्या; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा संताप — “सामान्यांवर कारवाई, मग बसचालकांना वेगळा न्याय का?”
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : चाकण येथील आंबेठाण चौकात पीएमपीएमएल बसचालकांकडून बेशिस्त पद्धतीने बस उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. भर चौकात शेजारी-शेजारी बस लावल्या जात असल्याने इतर वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून, यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.आंबेठाण चौक हा चाकण परिसरातील अत्यंत वर्दळीचा चौक आहे. या मार्गावर दिवसभर दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच पीएमपीएमएल बसची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याऐवजी चौकाच्या परिसरातच बस उभ्या केल्या जात असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नियम फक्त सामान्य वाहनचालकांसाठीच?
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सामान्य वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसचालकांकडूनच रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, तर संबंधितांवर कारवाई का केली जात नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.“सामान्य नागरिकाने रस्त्यावर गाडी उभी केली तर वाहतूक विभाग तत्काळ कारवाई करतो; मग पीएमपीएमएलच्या बसचालकांसाठी वेगळे नियम आहेत का?” असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाहतूक विभाग नेमकी भूमिका काय घेणार?
आंबेठाण चौकातील हा प्रकार वाहतूक विभागाच्या निदर्शनास येत नसल्यास तो गंभीर प्रश्न आहे आणि निदर्शनास येऊनही कारवाई होत नसेल तर त्याहून गंभीर बाब असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.पीएमपीएमएल प्रशासनाने बस थांबविण्यासाठी योग्य व नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच चौकात वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर वाहतूक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून बेशिस्त पार्किंग करणाऱ्या बसचालकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघाताची घटना घडण्याची वाट पाहणार का?
चौकात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बसमुळे एखाद्या वाहनाला अचानक मार्ग बदलावा लागल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे “एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहतूक विभाग आणि पीएमपीएमएल प्रशासन याबाबत काय ठोस पावले उचलणार, याकडे आता चाकणकरांचे लक्ष लागले आहे.वाहतूक नियम सर्वांसाठी समान असतील, तर आंबेठाण चौकात बेशिस्त पद्धतीने बस उभ्या करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.