चिखली पोलिसांची मोठी कारवाई घरफोडीसाठी वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक; ५ वाहनचोरीचे गुन्हे उघड, ₹२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज,

पिंपरी-चिंचवड,(प्रतिनिधी) : चिखली पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने घरफोडी करण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करत वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे ₹२ लाख ९५ हजार किमतीच्या चार मोटारसायकली आणि एक रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

२६ जुलै २०२६ रोजी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहनचोरीच्या घटनांचा तपास करताना सपोनि सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यामध्ये रेकॉर्डवरील वाहनचोर राज ऊर्फ ढेकऱ्या संतोष बापर्डेकर (वय २३, रा. शिवपार्वती हौसिंग सोसायटी, ताम्हाणेवस्ती, चिखली) हा साथीदारांसह वाहन चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, पोलीस हवालदार प्रविण भोमाळे व विनोद व्होनमाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी राज संतोष बापर्डेकर आणि शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) यांना शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीदरम्यान आरोपींनी पाच वाहनचोरी आणि दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेले वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी बुलेट (एमएच ४३ बीटी ०८१४), स्प्लेंडर (एमएच १४ जेडब्ल्यू १०५४), होंडा शाईन (एमएच १४ एलके ८८६३), सुझुकी अॅक्सेस (एमएच १४ जीएक्स २०७६) आणि ऑटो रिक्षा (एमएच १४ एचएम १०३२) जप्त केली.

पोलीस तपासात राज बापर्डेकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी १२ वाहनचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तर शंकरसिंग टाक हा हडपसर, मांजरी, येरवडा आणि निगडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चार गंभीर गुन्ह्यांमध्येही वाँटेड आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुभाष चव्हाण तसेच डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

महत्त्वाची नोंद – कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहिती इनबॉक्स करा. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की मेसेज मध्ये संपर्क साधा..


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *