मोशी कचरा डेपो दुर्घटना : प्रकल्प प्रमुख व सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, ९ जणांच्या मृत्यूप्रकरणी कारवाई

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पिंपरी-चिंचवड, दि. १४ जुलै : मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अॅटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०५, १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महानगरपालिकेचे कर्मचारी सोहन मधुकर निकम (वय ५५, रा. निगडी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राट अॅटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीला दिले आहे.

८ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास मोशी येथील कचरा डेपो परिसरात एसएलएफ (Sanitary Landfill) चा काही भाग ढासळून इमारतीवर आणि शेजारील रस्त्यावर कोसळला. यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगारांवर माती व कचऱ्याचा ढिगारा कोसळून भीषण दुर्घटना घडली.फिर्यादीनुसार, पावसाळ्यात एसएलएफ सुरक्षित राहावा तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे ही कंपनीची जबाबदारी होती. मात्र, संभाव्य धोका माहिती असूनही प्रकल्प प्रमुख अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय ५९) आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ (वय ३८) यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडून नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत भावेश मोहन वाणी, अक्षय राजू सावंत, नागेश सर्जेराव गायकवाड, सुनील भारत कोरके, महेश सुरेश कुंभार, सनी अशोक माने, राहुल धोंडीबा गायकवाड, रणजीत जयवंत पाटील आणि वामन दगडू कसबे यांचा मृत्यू झाला. तसेच १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *