श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गुन्हे शाखा युनिट-३ ची उल्लेखनीय कामगिरी; सोनसाखळी चोरणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडले

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने उल्लेखनीय कामगिरी करत भाविकाचे सोन्याचे गंठण हिसकावणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडले. आरोपींकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. ही पथके आळंदी ते बोपखेल फाटा या मार्गावर साध्या वेशात वारकऱ्यांमध्ये मिसळून सतत गस्त घालत होती.या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे तसेच पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखील फापाळे आणि स्वप्नील महाले यांचा समावेश होता.

पालखी सोहळा दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर एक महिला भाविक पालखीचे दर्शन घेत असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र मागे उभ्या असलेल्या दोन महिलांपैकी एका महिलेने हिसकावले आणि ते सोबतच्या महिलेकडे दिले. ही घटना पथकातील पोलीस अंमलदार दिलीप राठोड आणि स्वप्नील महाले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांना सूचना दिली. त्यानंतर संपूर्ण पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही महिलांना जागीच पकडले.

चौकशीत मुख्य आरोपीचे नाव नयना विष्णू काळे (वय २०, रा. धारेगाव, मिटमिटा छावणी, संभाजीनगर) असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित मुलीलाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, सुमारे १.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले.

याप्रकरणी फिर्यादी सुनिता नारायणराव राऊत (वय ५०, रा. चोली फाटा) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुदर्शन साईदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे आणि पोलीस अंमलदार सुरेखा बोरसे, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, दिलीप राठोड, निखील फापाळे व स्वप्नील महाले यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.पालखी सोहळ्यासारख्या लाखो भाविकांच्या उपस्थितीतील धार्मिक कार्यक्रमात साध्या वेशात तैनात राहून चोरीचा गुन्हा क्षणार्धात उघडकीस आणत आरोपींना रंगेहात पकडल्याने गुन्हे शाखा युनिट-३ च्या दक्षता, नियोजन आणि सतर्कतेचे कौतुक होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *