मुसळधार पावसानंतर नगराध्यक्ष मनीषाताई गोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते साहेबराव कड व नगरसेवकांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण : (प्रतिनिधी) काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण शहर आणि परिसरातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मनीषाताई गोरे व सर्व नगरसेवकांनी तातडीने शहरातील विविध पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी गट नेते साहेबराव कड तसेच नगरसेवक, अधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी शहरातील विविध भागांना भेट देत पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले. काही भागांमध्ये गटारे तुंबल्याने पाणी घरांच्या परिसरात शिरले, तर रस्त्यांवरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व जलनिस्सारणाची कामे प्रभावीपणे झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगराध्यक्ष मनीषा गोरे यांनी संबंधित विभागांना पाणी साचलेल्या भागांमधून तातडीने पाण्याचा निचरा करण्याच्या, गटारे व नाल्यांची स्वच्छता करण्याच्या तसेच नागरिकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.गट नेते साहेबराव कड यांनीही प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने काम करावे, नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्यावा आणि शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. त्यांनी नैसर्गिक ओढे, नाले आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नियोजनबद्ध विकास करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली असून पाणी साचलेल्या भागांमध्ये कर्मचारी व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा आणि पावसादरम्यान सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चाकणसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक शहरात प्रत्येक पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीमुळे जलनिस्सारण, नालेसफाई, अतिक्रमण हटविणे आणि शाश्वत नागरी नियोजन या मुद्द्यांवर तातडीने प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *