चाकण, ( सम्राट राऊत) काल झालेल्या सततच्या पावसामुळे चाकण शहरातील प्रभाग क्रमांक आठ (राऊत आळी) मध्ये झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून थेट विद्युत वाहक तारांवर तसेच काही घरांच्या छतांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित भागातील धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने हटविण्याची मागणी नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडे वारंवार केली. मात्र, अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते किशोर जगनाडे यांनी केला आहे.विद्युत वाहक तारांवर फांद्या अडकल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची तसेच शॉर्टसर्किट होऊन अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या घरांच्या छतांवर पडल्याने घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुणाल राऊत यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी करणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मात्र वेळेवर देखभाल न झाल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान, नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणांची पाहणी करून विद्युत तारांवर व घरांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवाव्यात, तसेच शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी त्वरित छाटणीची मोहीम राबवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक शिवाजी भोई यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.