
रोखठोक मराठी न्युज, आळंदी | प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली इंद्रायणी नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नदीतील साचलेला कचरा, दूषित पाणी आणि दुर्गंधी पाहून नागरिक संतप्त झाले असून, “पिंपरी-चिंचवडचे पाप तीर्थक्षेत्राच्या माथी का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या मते, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी दरवर्षी विविध योजनांतून मोठा निधी मंजूर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात नदीतील प्रदूषण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे “निधी खर्च होतोय नेमका कुठे?”, “कामे कोणती झाली?” आणि “नदी प्रदूषणमुक्त कधी होणार?” असे प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातून नदीत मिसळणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि घनकचरा यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आल्याची चिंता पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. याचा परिणाम केवळ नदीवरच नव्हे, तर जलचर, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.विशेष म्हणजे, आषाढी व कार्तिकी वारीसह वर्षभर लाखो भाविक आळंदीत येतात. अशा वेळी नदीचे दूषित स्वरूप भाविकांच्या श्रद्धेलाही धक्का देणारे ठरत आहे.
तीर्थक्षेत्राच्या नावाने विकासकामांसाठी निधी मंजूर होत असताना, नदीची परिस्थिती मात्र “जैसे थे” का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नागरिकांचे थेट प्रश्नइंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी आतापर्यंत किती निधी मंजूर झाला?
त्या निधीतून नेमकी कोणती कामे पूर्ण झाली?
नदीत मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे रोखण्यासाठी कोणती उपाययोजना झाली?
प्रदूषण नियंत्रणासाठी जबाबदार विभागांवर कारवाई झाली का?इंद्रायणी नदी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी निश्चित कालबद्ध आराखडा आहे का?
आज समोर आलेले हे छायाचित्र केवळ प्रदूषणाचे नाही, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांचेही प्रतीक ठरत आहे. श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष आणि परिणामकारक कृतीची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.आता प्रशासन या प्रश्नांना उत्तर देणार की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहणार? याकडे वारकरी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.