चार वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप; राजगुरुनगर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

राजगुरुनगर, दि. ३ (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील चाकण येथे २०१६ मध्ये घडलेल्या चार वर्षीय चिमुकल्या संजोग उर्फ बंकू संजय भोंडवे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी सचिन दत्तात्रय पिंगळे (वय ४६, रा. चाकण) याला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे हा निकाल दिला.

न्यायालयात सादर झालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०१६ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन पिंगळे आणि त्याच्या अल्पवयीन मुलीने शेजारी राहणाऱ्या चार वर्षीय संजोग उर्फ बंकू याला खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. संजोगची आई मुलाला पाठविण्यास तयार नसतानाही त्याला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप आहे.सायंकाळपर्यंत संजोग घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि भावाने परिसरात शोधाशोध सुरू केली. आरोपीच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेजाऱ्यांनी संजोग आरोपीच्या घरात जाताना पाहिल्याचे आणि त्यानंतर तो बाहेर न आल्याचे सांगितल्याने संशय अधिक बळावला.यानंतर नातेवाईक आणि परिसरातील नागरिक आरोपीच्या घरात शोध घेण्यासाठी गेले. सुरुवातीला आरोपी आणि त्याच्या मुलीने घरात शोध घेण्यास विरोध केला.

शोधमोहीमे दरम्यान घरातील बेडरूममध्ये असलेल्या भूमिगत पाण्याच्या टाकीकडे उपस्थितांचा संशय गेला. टाकीचे झाकण उघडण्यास आरोपीने तीव्र विरोध केला. मात्र, नागरिकांनी झाकण उघडून पाहिले असता टाकीतील पाण्यात संजोगचा मृतदेह आढळून आला.त्यानंतर संजोगला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन अहवालात संजोगचा मृत्यू नाक व तोंड दाबून गुदमरविल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या निष्कर्षानंतर चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास करून आरोपीला अटक केली.या प्रकरणाचा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात चालला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील संदीप वाघ यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्या दरम्यान मृत मुलाचे आई-वडील, भाऊ, शवविच्छेदन करणारे डॉक्टर तसेच शोधमोहीमेत सहभागी झालेल्या नागरिकांसह एकूण १० साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.

साक्षीदारांच्या जबाब, वैद्यकीय अहवाल आणि अन्य भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला.सर्व पुरावे आणि साक्षींचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपी सचिन दत्तात्रय पिंगळे याला भारतीय कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्यावर २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सतीश इंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला.

या निकालाचे कायदे वर्तुळासह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास, भक्कम पुरावे आणि सक्षम न्यायप्रक्रिया यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *