
रोखठोक मराठी न्यूज
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी ) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत ७० हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या तसेच पोलिसांवर गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मे २०२६ रोजी झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव आणि त्याचे तीन साथीदार फरार झाले होते. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते.तपासा दरम्यान पोलिसांना आरोपी शेखर जाधव आणि त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक रवाना झाले असता आरोपींनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. त्यानंतर उसाच्या शेताचा फायदा घेत दोघेही पसार झाले. या घटनेप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांनी सातत्याने तपास करत नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत जाऊन माहिती गोळा केली. गोपनीय बातमीदारांचे जाळे तयार करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १४ जून २०२६ रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात सापळा रचला.
या कारवाईत शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोधा, ता. उदगीर, जि. लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.झडती दरम्यान आरोपीकडून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेखर जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीसह विविध स्वरूपाचे ७० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवर गोळीबार करून फरार झालेल्या या आरोपीच्या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.