
रोखठोक मराठी न्युज
पिंपरी, दि. १४ जून : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चैन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी असा एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या चैन चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेतील सर्व पथकांना विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेकडून विविध गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता.
दरम्यान, ९ जून २०२६ रोजी आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या घटनेत फिर्यादीस दुखापतही झाली होती. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान १३ जून रोजी पोलीस शिपाई अमर कदम यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानंतर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, अमर कदम, गणेश हिंगे आणि चंद्रकांत गडदे यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे वैष्णव शरद कदम (वय २०), सचिन जालिंदर कदम (वय ४२) आणि विजय ज्ञानेश्वर कदम (वय ३३) अशी असून तिघेही हवेली तालुक्यातील निरगुडी येथील रहिवासी आहेत.चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली ३३.८१० ग्रॅम वजनाची, सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली अंदाजे ८ लाख रुपये किंमतीची चारचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली.
अशा प्रकारे एकूण १२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अटक आरोपींना पुढील तपासासाठी आळंदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्यात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे यांच्यासह गणेश हिंगे, नितीन लोखंडे, अमर कदम, चंद्रकांत गडदे, सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, हर्षद कदम, मोहसिन आत्तार, विनोद वीर, गणेश सावंत आणि औंदुबर रांगे यांनी विशेष योगदान दिले.अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.