रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पुणे, प्रतिनिधी : जिल्ह्यातील रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातग्रस्त (ब्लॅक स्पॉट) स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तातडीने सुचवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागांचा लवकरच आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील अपघातजन्य मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे ब्लॅक स्पॉटची पाहणी करून अपघातांची कारणे व आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल २९ जून २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.अपघात प्रतिबंधासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी गांभीर्याने अंमलबजावणी करावी. कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देतानाच नवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी यापूर्वी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना तातडीने राबविण्याची सूचना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका परिसरात जनजागृतीपर मोठे फलक उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच अपघातप्रवण स्थळांची यादी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी दौरे आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडी आणि अपघातांमागे नियमांचे उल्लंघन हे प्रमुख कारण असल्याचे नमूद करत नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.बैठकीत परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रस्ते सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर केली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *