
रोखठोक मराठी न्यूज
पिंपरी-चिंचवड,(प्रतिनिधी) महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या सराईत चैन स्नॅचरला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अक्षरशः फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपीकडून पाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून तब्बल १५ लाख रुपये किमतीचे ७६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजता विशालनगर, पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज सोसायटीसमोर पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून नेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी विशेष तपास पथके तयार केली.
२०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
तपासा,दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासात आरोपीने यापूर्वी तळेगाव दाभाडे, देहूरोड, दापोडी परिसरातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले.
आरोपी ये-जा करण्यासाठी बंगळुरू महामार्गाचा वापर करत असल्याचे तसेच तो वारंवार बाणेर परिसरात फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
बाणेरमध्ये सापळा, आरोपीला संशय आणि सुरू झाला थरारक पाठलाग
गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरात सलग दोन ते तीन दिवस अहोरात्र सापळा रचला. अखेर ७ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी पुन्हा एकदा चैन स्नॅचिंगच्या उद्देशाने बाणेर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने स्पोर्ट्स बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग केला. काही अंतरावरील पाठलागानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
सराईत गुन्हेगार निघाला आरोपी
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित गोविंद इंगळे (वय ३१ वर्षे) असे असून तो मूळचा श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील आहे. सध्या तो हवेली तालुक्यातील मामुर्डी परिसरात राहत होता.पोलीस चौकशीत आरोपी हा एकटाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून सांगवी, दापोडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड तसेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकडून एकूण ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट्स बाईकही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही गंभीरपोलीस तपासात सुमित इंगळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात हिंजवडी, सांगवी, शिरवळ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, फसवणूक आणि दरोड्यासंदर्भातील अनेक गुन्हे यापूर्वी नोंद आहेत. २०१६ पासून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या पथकाचे कौतुकही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक कर्मराज गावडे यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने पार पाडली.या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डोळा ठेवणाऱ्या चैन स्नॅचर्सना मोठा धक्का बसला असून गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.