भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट; कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

चाकण (कल्पेश अ. भोई ) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर या पवित्र तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी या प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भीमाशंकर येथे मुख्य मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा आणि ब्रह्मध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या कामांची पाहणी केली.यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील , बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी , मंदिर विश्वस्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंदिर परिसर विकासाला गतीमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू असलेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करताना सांगितले की, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला देशभरातून लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास करताना धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे.मंदिराच्या मूळ वास्तूचे जतन करत सभामंडपाचा जीर्णोद्धार, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंजूर आराखड्यानुसार कामांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून भीमाशंकरचे संपूर्ण रूप पालटणार आहे.

या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे उभारले जाणार आधुनिक गावभीमाशंकर परिसरातील विकासकामांमध्ये हेरिटेज वाडी प्रकल्पाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे दीडशे कुटुंबांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यात येत आहे.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी शेजारीच आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन गाव विकसित केले जात आहे. हे केवळ पुनर्वसनाचे गाव नसून तेथील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणारे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे केंद्र ठरेल.नव्या गावात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, सार्वजनिक सुविधा आणि अन्य मूलभूत सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र रस्ते

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचेही व्यापक नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग विकसित केले जात आहेत. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.विशेषतः सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

व्यापारी आणि भाविक दोघांचाही विचार

विकास प्रकल्पात स्थानिक व्यावसायिकांच्या हिताचाही विचार करण्यात आला आहे. दुकाने, बसस्थानक, विश्रांती सुविधा आणि इतर सार्वजनिक सोयी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने उभारल्या जात आहेत.यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, तर स्थानिक व्यापारालाही चालना मिळणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

भाविकांची संख्या अनेकपटींनी वाढणार

भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे भविष्यात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. सध्याच्या तुलनेत पाच ते दहा पट अधिक भाविक येथे दाखल होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.त्यामुळे निवास, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या सुविधांचे दीर्घकालीन नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.स्थानिकांच्या सहकार्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुकया प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष उल्लेख केला. विकासकामे आणि पुनर्वसन प्रक्रियेत ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे प्रकल्पाला अपेक्षित वेग मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.धार्मिक पर्यटनाला मिळणार नवी ओळखभीमाशंकर मंदिर परिसर विकास आणि हेरिटेज वाडी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे तीर्थक्षेत्र आधुनिक सुविधा आणि पारंपरिक वारसा यांचा सुंदर संगम म्हणून विकसित होणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या धार्मिक पर्यटन नकाशावर भीमाशंकर अधिक प्रभावीपणे झळकणार असून भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *