
रोखठोक मराठी न्यूज
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पर्दाफाश करत दुबई आणि थायलंडमधून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस (Red Corner Notice) आणि लूकआउट सर्क्युलर (LOC) यांच्या आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, 11 जून 2026 रोजी त्याला भारतात आणून अधिकृत अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे असे असून तो दुबईतून सायबर फसवणुकीचे मोठे जाळे चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
तीन मोठ्या गुन्ह्यांच्या तपासातून उघड झाले रॅकेट
देहूरोड पोलीस ठाण्यातील ऑनलाइन टास्क स्कॅम प्रकरण (गु.र.नं. 293/2024), हिंजवडी पोलीस ठाण्यातील शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरण (गु.र.नं. 770/2024) तसेच सायबर पोलीस ठाण्यातील तब्बल 2 कोटी 66 लाख रुपयांच्या शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा (गु.र.नं. 12/2025) तपास करताना या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला.जून 2024 मध्ये देहूरोड प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी करताना आरोपी दीपक गाडे हा दुबई येथे जाऊन सौरभ उर्फ गणेश काळे याला भेटल्याचे निष्पन्न झाले. तसेच भारतातील विविध बँक खात्यांची माहिती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड आरोपी काळेला पुरविण्यात येत असल्याचे उघड झाले.
दुबईतून चालवत होता मुख्य कार्यालय
सायबर पोलिसांच्या तपासात आरोपी गणेश काळे याने दुबईमध्ये सायबर फसवणुकीचे व्यवहार हाताळण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू केल्याचे समोर आले. भारतातील विविध व्यक्तींकडून मिळविलेल्या ‘म्युल अकाउंट्स’चा वापर करून सायबर गुन्ह्यांतील रक्कम वळविण्याचे काम तो करत होता.सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासातून आरोपीचे चीनसह इतर परदेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मदतीने आरोपी भारतातील नागरिकांना ऑनलाइन टास्क फ्रॉड, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध क्लृप्त्यांच्या माध्यमातून गंडा घालत होता.
दुबईहून थायलंडला पलायन
तपासाचा फास आवळला जात असल्याची चाहूल लागताच आरोपी सप्टेंबर 2025 मध्ये दुबई सोडून थायलंडमधील बँकॉक येथे पळून गेला. मात्र पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला.उपलब्ध पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आरोपीच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानंतर इंटरपोलमार्फत आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस आणि एलओसी जारी करण्यात आली.
बँकॉक विमानतळावर अटक
केंद्रीय गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून आरोपी गणेश काळे हा थायलंडमधून अन्य देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर पकडला गेला. त्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले.11 जून 2026 रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस हवालदार हेमंत खरात आणि पोलीस शिपाई नितेश बिचेवार यांच्या पथकाने त्याचा ताबा घेतला. त्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
इतर राज्यांतील गुन्ह्यांचाही उलगडा
गणेश काळे याच्या अटकेमुळे देशातील विविध भागांतील अनेक गंभीर सायबर गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये मुंबई येथील नोडल सायबर पोलीस ठाणे, मालवणी पोलीस ठाणे तसेच तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही धडाकेबाज कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिवास पवार, तत्कालीन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकाचे विशेष योगदानया कारवाईत पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोनण, तसेच दीपक भोसले, हेमंत खरात, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे आणि पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.सायबर गुन्हेगारीविरोधातील ही कारवाई महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सायबर तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.