कमला एकादशीनिमित्त आळंदीत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; इंद्रायणी आरती, कीर्तन सेवा आणि हरिनाम गजराने भक्तिमय वातावरण

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

आळंदी (अर्जुन मेदनकर) : कमला एकादशीनिमित्त आळंदी नगरीत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरात पारंपरिक धार्मिक विधी, कीर्तन सेवा, हरिनाम गजर आणि इंद्रायणी आरती यांचे आयोजन करण्यात आले. यामुळे संपूर्ण आळंदी परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

एकादशीनिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. फुलांच्या मनमोहक सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसत होते. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने मंदिर परिसर गजबजून गेला होता.मात्र, दर्शनबारीच्या नियोजनातील त्रुटींमुळे काही काळ भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मंदिरातील काही प्रवेशद्वारे बंद ठेवल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये नाराजी पसरली. गर्दी वाढल्याने काही ठिकाणी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. यामुळे संतप्त भाविकांनी व्यवस्थापना विरोधात नाराजी व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद असलेले दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले. त्यानंतर दर्शनव्यवस्था सुरळीत करण्यात आली.दरम्यान, इंद्रायणी नदी घाटावर पारंपरिक पद्धतीने कीर्तन सेवा आणि हरिनाम गजराचे आयोजन करण्यात आले.

इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने सायंकाळी इंद्रायणी मातेला महाआरती अर्पण करण्यात आली. आरतीवेळी घाटावर उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर करत भक्तिरसात तल्लीन होत सहभाग नोंदविला. या प्रसंगी समितीच्या संयोजिका अनिता झुजम, अनिता शिंदे, सुवर्णा काळे, गोविंद ठाकूर तसेच संयोजक अर्जुन मेदनकर उपस्थित होते.आळंदीतील कीर्तन परंपरेचा महत्त्वाचा वारसा जपणाऱ्या वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बुवा गुरव आळंदीकर यांच्या गुरव फडावरही एकादशीनिमित्त विशेष कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ प्रत्येक वद्य एकादशीला या फडावर अखंड कीर्तन सेवा सुरू असून आजही ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. या फडावर अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा अर्पण केली आहे. त्यामध्ये हभप रंगनाथ महाराज परभणीकर, हभप धुंडा महाराज देगलुरकर, हभप किसन महाराज साखरे, हभप वक्ते महाराज बाबा यांसारख्या ज्येष्ठ कीर्तनकारांचा समावेश आहे.कमला एकादशीच्या निमित्ताने गुरव फडावरही विशेष कीर्तन सेवा रुजू झाली.

याबाबत माहिती देताना फडाचे वंशज संकेत वाघमारे यांनी या परंपरेचा इतिहास सांगितला. तसेच इंद्रायणी सेवा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देवतळे ऋषीकेश महाराज यांच्या कीर्तन सेवेने भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले. या कीर्तनासाठी वादक कृष्णा महाराज घंगाळे आणि गायक करण महाराज पाटील (पंढरपूरकर) यांनी सुरेल साथ दिली.सायंकाळी आळंदी देवस्थानच्या वतीने इंद्रायणी नदी घाटावर भव्य इंद्रायणी आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन, मंत्रोच्चार आणि हरिनामाच्या गजरात झालेल्या या आरतीने भाविक मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर रवी लांडगे, देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, निलेश महाराज लोंढे, योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.याच वेळी खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आळंदी देवस्थानला रुग्णवाहिका भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. या प्रसंगी डॉ. राम गावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कमला एकादशीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे आळंदी नगरीत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला. इंद्रायणी आरती, हरिनाम गजर आणि कीर्तन सेवेमुळे भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली, तर शतकभराची कीर्तन परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने जपली जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *