रोखठोक मराठी न्यूज
पुणे, (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे.
पाषाण परिसरात फिरत असलेल्या एका कंटेनरवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पप्पूलाल बिश्नोई याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला १० जून रोजी सुतारवाडी परिसरात उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकाने सापळा रचून संबंधित कंटेनरचा शोध घेतला. पाषाण परिसरात कंटेनर आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली.झडती दरम्यान मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला. प्राथमिक तपासात हे मद्य गोव्यात तयार करण्यात आले असल्याचे समोर आले. मात्र, या मद्यावर मध्यप्रदेशातील अधिकृत मद्य असल्याचा भास निर्माण करण्यासाठी बनावट लेबलांचा वापर करण्यात आला होता.
बनावट लेबलांच्या माध्यमातून मद्याची विक्री करून शासनाची फसवणूक तसेच महसूल बुडविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.अधिकाऱ्यांनी कंटेनरमधील संपूर्ण मद्यसाठा जप्त केला असून त्याची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कंटेनर आणि इतर साहित्यही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पप्पूलाल बिश्नोई याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मद्यसाठ्याचा स्रोत, वितरण साखळी आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींबाबत चौकशी सुरू आहे. बनावट लेबलांच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये मद्याची अवैध विक्री केली जात होती का, याचाही तपास उत्पादन शुल्क विभाग करत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अवैध मद्यविक्री किंवा संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.
या कारवाईमुळे पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्यव्यवसायावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.