
रोखठोक मराठी न्यूज
देहूरोड, (प्रतिनिधी ): देहूरोड परिसरातील घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत देहूरोड पोलिसांनी अट्टल घरफोड्या आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेले शंभर टक्के सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले आहे.
गोयल निवास, फ्लॅट क्रमांक २, मुंबई-पुणे रोड, देहूरोड मेन बाजार येथे घराला कुलूप लावून कुटुंबीय बाहेर गेले असताना २ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ३ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यामध्ये ५२ ग्रॅम सोन्याचे व सुमारे २२५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर व सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळाजवळ भगव्या रंगाची ऑटो रिक्षा आढळून आली. गुप्त माहितीच्या आधारे संबंधित रिक्षाचा माग काढण्यात आला असता ती देहूगाव परिसरात गेल्याचे निष्पन्न झाले. वैकुंठ मंदिर परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव विक्रमसिंग विठ्ठलसिंग ठाकुर (वय ३७, रा. देहूगाव) असे सांगितले.त्याच्या ऑटो रिक्षामध्ये घरफोडीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी कटावणी आढळून आली. अधिक चौकशी केली असता त्याने गोयल निवास येथील घरफोडीची कबुली दिली.
पुढील तपासात आरोपी हा अट्टल घरफोड्या असून त्याच्याविरुद्ध निगडी, भोसरी, चिखली, वाकड तसेच इतर पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले सर्व सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यामुळे या गुन्ह्यातील चोरीचा शंभर टक्के ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने आणखी घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव, ग्रेड पीएसआय लखनकुमार वाव्हळे, पोलीस हवालदार किरण खेडकर, बाळासाहेब विधाते तसेच प्रशांत माळी, केतन कानगुडे, पंकज भदाणे, अमोल माने, शुभम बावणकर आणि मोमीन शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.