जुन्नर शहरात कोयता गँगची दहशत; सहा जणांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

जुन्नर, प्रतिनिधी : जुन्नर शहरातील गजबजलेल्या सदाबाजार पेठेत भरदिवसा कोयते आणि लोखंडी हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा जणांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी इरफान माजिद हलवाई याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास सदाबाजार पेठेतील एका बांगड्यांच्या दुकानासमोर काही तरुणांनी हातात कोयते आणि इतर हत्यारे घेऊन मोठा गोंधळ घातला. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ आणि आक्रमक वर्तन करत त्यांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.

या प्रकरणी पोलिस हवालदार कैलास माधव केंद्रे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपी अरबाज माजिद हलवाई आणि मुजम्मील इरफान हलवाई हे हातात कोयते घेऊन नागरिकांच्या अंगावर धावून जात होते. तर इरफान माजिद हलवाई हा लोखंडी रॉड असलेली चैनव्हील हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करत होता.याशिवाय शायरा माजिद हलवाई, मुस्कान अरबाज हलवाई आणि मोहसीन इकबाल अत्तार (सर्व रा. सदाबाजार पेठ, जुन्नर) हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने ओरडून, शिवीगाळ करून आणि गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने कारवाई करत इरफान माजिद हलवाई याला ताब्यात घेऊन अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वीही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे.या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांनी शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे. भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत अशा प्रकारे हत्यारे घेऊन दहशत माजविल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार हिले हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *