पुण्यातील विषारी दारू प्रकरण : १९ जणांच्या मृत्यूनंतर पोलीस व उत्पादन शुल्क विभागातील २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पुणे, (प्रतिनिधी) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा, पर्यवेक्षणाचा अभाव आणि बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पोलीस विभागातील ९ अधिकारी-कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातील तिघांवर कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर परिसरातील बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात झालेल्या हलगर्जीपणाबाबत कठोर भूमिका घेतली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षक हसिना सिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले.

दापोडी पोलीस ठाण्यातील सहा जण निलंबित

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही तत्काळ कारवाई करत दापोडी पोलीस ठाण्यातील सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर तसेच पोलीस अंमलदार विशाल काळे, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे आणि सागर जाधव यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही मोठी कारवाई या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जबाबदारी निश्चित करत १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात तीन निरीक्षक, सहा दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश असून, बेकायदेशीर दारू निर्मिती आणि विक्रीविरोधातील कारवाईत झालेल्या त्रुटींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना

हडपसर आणि फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारूची विक्री झाल्यानंतर अनेक नागरिकांनी ती सेवन केली. त्यातून आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या दारूमध्ये घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेमुळे पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीकडे स्थानिक यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्काप्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि प्रभावी पर्यवेक्षणाच्या अभावामुळे ही गंभीर घटना घडली. या प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असून कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चौकशी सुरू

विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत होते आणि या अवैध व्यवसायाला कोणाचे संरक्षण होते का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बेकायदेशीर दारूविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *