पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी ) : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पॉक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीला उदगीर (जि. लातूर) येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोशी परिसरात एका अल्पवयीन मुलीला मारहाण, शिवीगाळ तसेच तिची छेडछाड केल्याप्रकरणी समीर केदारनाथ शिंदे (रा. लक्ष्मीनगर, मोशी, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८(२), ३५२, ११५(२), ३२४ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) अधिनियम कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना गोपनीय माहितीदारामार्फत आरोपी त्याच्या मूळ गावी गुरदाळ, ता. उदगीर, जि. लातूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उदगीर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.
दरम्यान, आरोपी समीर शिंदे हा कर्नाटककडे जाण्यासाठी निघाला असताना उदगीर बस डेपो परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ३) मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त (एमआयडीसी भोसरी विभाग) सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस अंमलदार स्वप्नील शेलार, सुहास कोंडेदेशमुख, स्वप्नील झनकर तसेच तपास पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश खडसे करीत आहेत.