पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : दापोडी पोलीस ठाणे हद्दीतील फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टी दारू सेवन केल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दिनांक २६ मे २०२६ ते २८ मे २०२६ या कालावधीत फुगेवाडी परिसरात काही नागरिकांनी गावठी हातभट्टीची दारू सेवन केली होती. त्यानंतर संबंधितांची प्रकृती बिघडल्याने त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नऊ जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये पांडुरंग सखाराम फुगे (५३), अकबर अजिमखान पठाण (४८), राजेश शांताराम राजपूत (५०), आनंद पांडेराव देसाई (५३), आनंद काशीनाथ निकाळजे (६४), भिमण्णा बसण्णा नागराल (२७), अक्षय अशोक अवसरमल (२८), सचिन रामचंद्र नेटके (३६) आणि सुरप्पा मनप्पा बंगारी (५५) यांचा समावेश आहे. सर्व मृत फुगेवाडी, दापोडी परिसरातील रहिवासी आहेत.मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी नमुने रासायनिक विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
दरम्यान, विषारी दारू सेवनामुळे आणखी पाच जणांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर मेडीपॉईंट हॉस्पिटल, औंध तसेच वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी येथे उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सुभाष डिग्गीकर, चंदन रामबली कुमार, श्रीमंत शिवपुत्र कोळी, जितू मनोहर शेदतपुरी आणि प्रकाश उमाजी राठोड यांचा समावेश आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०५, १२३, ११०, १२५, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई), ६८, ८१ आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान पोलिसांनी कर्नेलसिंह तखतसिंह विरका (७३), गुरमंगतसिंह कर्नलसिंह विरका (४५), योगेश रामचंद्र व्हानकडे (२३) आणि राधेशाम हरिराम प्रजापती (३५) यांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच कल्पेश अशोक आग्रवाल (२९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांच्यावरही कारवाई केली आहे.या घटनेमुळे फुगेवाडी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.