पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी ): पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२ प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विशेष पथके तयार केली होती.
ही पथके आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निखिल वर्पे आणि विजय दौंडकर यांना संशय आल्याने त्यांनी २७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.२५ वाजता चाकण दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्रापूर-चाकण महामार्गालगत मोहितेवाडी, शेलपिंपळगाव येथे हॉटेल वैष्णवी समोर सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले :1. संदीप भगवान हांडे (वय २८)रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणेमूळ रा. पिंपरखेड, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर1. गणेश सुरेश तारू (वय ३०)रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणेमूळ रा. घोडगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे1. रिहान वसिम शेख (वय १९)रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणेआरोपींकडून २३ किलो ५३८ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुकाळे करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस कर्मचारी निखिल शेटे, विजय दौंडकर, सदानंद रूद्राक्षे, गोविंद डोके, निखिल वर्षे, संतोष सपकाळ आणि चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी नागेश माळी, प्रकाश ननावर आणि सुभाष गुरव यांनी मदत केली.दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून अंमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२० या क्रमांकावर, पोलीस हेल्पलाईन ११२ वर किंवा ‘मानस’ हेल्पलाईन १९३३ तसेच infoncbmanas@gov.in वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.