मोशीतील अनिल गोळे ( मोरे ) खून प्रकरणाचा छडा; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून ४ आरोपींना बेड्या

Spread the love

पिंपरी-चिंचवड (रोखठोक मराठी न्यूज):

पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या मोशी टोलनाक्याजवळील अनिल मारुती गोळे ऊर्फ मोरे यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या जाळ्याचा वापर करून पोलिसांनी चार अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमकी घटना काय होती? १३ मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळील ‘युवराज गार्डन’ हॉटेलमध्ये अनिल मारुती गोळे यांची अज्ञात इसमांनी चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी नागनाथ कुंडलिक चाटे यांनी एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार खुनाचा गुन्हा (बी.एन.एस. कलम १०३ (१) व इतर कलमान्वये) दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई : गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी तातडीने तपास पथके रवाना केली. आरोपींचा कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची शिताफीने जुळवाजुळव केली. अखेर पोलिसांनी भोसरी परिसरातून चार आरोपींना निष्पन्न करून त्यांना १५ मे २०२६ रोजी अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:1. नागेश लक्ष्मण काळे (वय २९, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी)2. अजय सर्जेराव गायकवाड (वय २०, रा. शांतीनगर, भोसरी)3. अजय सिकंदर आव्हाड (वय २७, रा. शांतीनगर, भोसरी)4. दत्ता चत्रभुज शिनगारे (वय ३०, रा. आंबेडकर वसाहत, लांडेवाडी)

एक आरोपी अद्याप फरार अटक करण्यात आलेल्या चौघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नितीन दिगंबर धोत्रे (रा. भोसरी) हा अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

पाेलिसांच्या कामगिरीचे कौतुकही यशस्वी कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त मारुती जगताप, व डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ, सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर यादव, पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले आणि कर्मचारी प्रशांत सोरटे, संजय जरे, चंद्रकांत गवारी, गणेश बोऱ्हाडे, राहुल लाखंडे तसेच तांत्रिक विश्लेषक राजू जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार स्वतः करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *