
रोखठोक मराठी न्यूज (वृत्त सेवा) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अत्यंत धाडसी आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत ए.जे. फर्निचर मॉलच्या मालकावर गोळीबार करणाऱ्या विष्णोई गँगशी संबंधित तीन आरोपींना उत्तराखंडातील हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.
दिनांक ०७ मे २०२६ रोजी जगदीश मेराराम बिष्णोई यांचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना परदेशी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आला होता. संबंधित व्यक्तीने तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली होती. मात्र अशोक कुमार बिष्णोई यांनी आरोपींना कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा खंडणीची रक्कम दिली नाही.यानंतर १५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ए.जे. फर्निचर मॉल, कुदळे फार्म, ताथवडे ते रावेत बीआरटी रोड, समाधान हॉटेलजवळ, पुनावळे येथे थरारक घटना घडली. जगदीश भेराराम बिष्णोई हे त्यांच्या फर्निचर मॉलच्या बाहेर बसलेले असताना दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले. आरोपींनी त्यांच्या जवळील पिस्टलमधून जगदीश बिष्णोई यांच्या दिशेने पाच ते सहा राऊंड गोळीबार केला.
सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले, मात्र शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाचा प्रयत्न, खंडणी, कटकारस्थान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर यांनी गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्याचे आदेश दिले. तपासासाठी सात स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी दोन पथके परराज्यात रवाना करण्यात आली.पोलीस निरीक्षक संदीप सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोलीस उपनिरीक्षक समीर लांडे, मयुरेश साळुंखे तसेच रावेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जवळपास ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी वास्तव्यास असू शकतील अशा लॉजेसचीही कसून तपासणी करण्यात आली.एका लॉजमध्ये संशयित आरोपी राहिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. आरोपी हरियाणातील रोहतक परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांच्या पथकाला तेथे पाठविण्यात आले.
रोहतकमध्ये सलग चार दिवस शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आरोपी हरिद्वार येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :1. परवीन रामनिवास (वय २२)रा. बेरी, झज्जर, हरियाणा1. पंकज कुलदीप (वय २१)रा. कलानौर, रोहतक, हरियाणा1. सागर अजयपाल (वय २१)रा. सोनीपत, हरियाणाचौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.
न्यायालयाने तिघांना २८ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, हा संपूर्ण कट विष्णोई गँगचे सदस्य आरजू बिष्णोई, शुभम लोणकर आणि कुलदीप ऊर्फ कशीष यांच्या सांगण्यावरून रचण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कुलदीप ऊर्फ कशीष हा प्रसिद्ध पंजाबी गायक Sidhu Moosewala यांच्या हत्याकांडातील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींना पिस्टल, काडतुसे, वाहने आणि पैसे हे विष्णोई गँगमार्फत पुरविण्यात आले होते. तसेच दिघी परिसरातील वीर फर्निचरच्या मालकांनाही विष्णोई टोळीने खंडणीसाठी धमक्या दिल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे.पोलीस आता या प्रकरणातील संपूर्ण कट, आरोपींना आश्रय देणारे आणि आर्थिक मदत करणारे इतर साथीदार यांचा शोध घेत आहेत. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुढील काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार, गणेश इंगळे, डॉ. विशाल हिरे, प्रविण मोरे, सुनिल कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, गुंडा विरोधी पथक, रावेत पोलीस ठाणे आणि टीएडब्ल्यू टीमने संयुक्तरीत्या पार पाडली.

