
रोखठोक मराठी न्यूज (प्रतिनिधी) खेड तालुक्याची ओळख, परंपरा आणि अस्मितेशी जोडलेले श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत तसेच खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांच्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, श्रीक्षेत्र भीमाशंकर हे खेड तालुक्याचाच अविभाज्य भाग म्हणून कायम राहावे यासाठी स्वर्गीय नारायणराव पवार यांनी सातत्याने संघर्ष केला होता. तसेच गेली अनेक वर्ष या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, भीमाशंकर खेडमध्येच कायम राहावे यासाठी भूमिका मांडण्यात आली आहे.
अलीकडे शिखर समितीच्या बैठकीत “भीमाशंकर खेड-आंबेगाव” असा उल्लेख करण्याबाबत चर्चा झाल्याने खेड तालुक्यातील जनतेमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शासनाच्या अधिकृत कार्यवृत्तात अशा उल्लेखाची नोंद झाल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात आणि खेड तालुक्याच्या अस्मितेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
या सोबतच खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ते योजना, जिल्हा परिषदेमार्फत विविध विकासकामे, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, शाळा वर्गखोल्या, अंगणवाडी, महावितरण अंतर्गत ट्रान्सफॉर्मर तसेच पीएमआरडीए अंतर्गत विकासकामांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.खेड तालुक्याच्या जनभावनांचा आदर राखून या विषयात योग्य स्तरावर हस्तक्षेप करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
