चाकण (प्रतिनिधी ):चाकण शहर आणि परिसरात आज दुपारच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे चाकणमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पुणे-नाशिक महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या संकटामुळे मोठी तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा इतका वेगवान होता की, काही भागात झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.
महामार्गावर पाण्याची तळी; वाहतूक कोंडीमुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. ड्रेनेज लाईन आणि चेंबर तुंबल्याने रस्त्याला ओढ्या स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, परिणामी मोठी वाहतूक कोंडी झाली.
चाकणचा परिसर हा औद्योगिक क्षेत्रासोबतच शेतीसाठीही ओळखला जातो. या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा आणि फळभाज्या उत्पादक शेतकरी या पावसामुळे धास्तावले आहेत.सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि चिखलामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन महामार्गावरील पाण्याचा निचरा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.