महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; पुणे आणि कोल्हापूरच्या पोलीस प्रशासना मध्ये महत्त्वाच्या बदल्या

Spread the love

रोखठोक मराठी बातम्या

पुणे (वृत्त सेवा ) : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने गृह मंत्रालयाने शुक्रवारी वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या फेरबदलांमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर परिक्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पुणे शहर पोलीस दलात ‘लेडी सिंघम’ तेजस्वी सातपुते यांची एन्ट्री

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त आणि महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मागील काही काळापासून राज्य राखीव पोलीस बलाच्या (SRPF) गट क्रमांक एकच्या समादेशक म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते यांची बदली पुणे शहर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांनी पंकज देशमुख यांची जागा घेतली आहे. आपल्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातपुते यांच्या नियुक्तीमुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणाला नवीन गती मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदे (IG) करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची वर्णी लागली आहे. दराडे यांचा अनुभव पुणे शहरासारख्या संवेदनशील शहरात मोलाचा ठरणार आहे.

पुणे ग्रामीण आणि युवा अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पुणे शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बदल करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांची पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, जिंतूर (परभणी) येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन देवाशिष बेनिवाल यांची पदोन्नतीने पुणे शहरात पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून बदली करण्यात आली आहे.कोल्हापूर परिक्षेत्र आणि सीआयडीमधील बदल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रंजनकुमार शर्मा पदभार स्वीकारतील.तसेच, ठाणे पोलीस आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. पाठक यांचीही पुणे शहर राज्य अन्वेषण विभागात बदली करण्यात आली आहे. याच विभागात अधीक्षक पदावर काम करत असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांना पदोन्नती देऊन त्यांची सीआयडीमध्येच उपमहानिरीक्षक (DIG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय गतीसाठी मोठे पाऊल

गृह मंत्रालयाने केलेल्या या बदल्यांमुळे वरिष्ठ स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या आहेत. आगामी सण-उत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हे बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. नवीन अधिकारी लवकरच आपल्या पदांचा कार्यभार स्वीकारतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *