
रोख ठोक मराठी बातम्या
पुणे क्राईम : हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॉम्ब ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. ऑनलाइन व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. शिवाजी राठोड (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा सोलापूरचा असून, पुण्यात मांजरी परिसरात वास्तव्यास होता.
दरम्यान,आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी रुग्णालय चालकाकडून पैसे उकळण्याच्या हेतूने आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयात बुधवारी बॉम्ब आढळून आला. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, आरोपीने सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात बॉम्ब ठेवला. त्यानंतर त्याने घरी जाऊन जवळच्या सलूनमध्ये दाढी केली. कपडे बदलून तो पुन्हा घटनास्थळी परतला. त्यावेळी रुग्णालय परिसरात पोलिसांची हालचाल सुरू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. हा बॉम्ब तयार करण्यासाठी आरोपीने अवघ्या ४०० रुपयांत बनावट बॉम्ब तयार केला. ऑनलाइन १६० रुपयांचे डिजिटल घड्याळ घेतले होते. त्यासोबत पीव्हीसी पाइप, वायर आणि चिकट टेपचा वापर करण्यात आला होता. हा बॉम्ब रुग्णालयात ठेवण्यासाठी आरोपीने एका दुकानात १५ रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करून चिकट टेप खरेदी केली होती. ही गोष्ट सीसीटीव्हीत दिसून आली होती. यातून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
ऑनलाइन पेमेंटशी संबंधित मोबाइल क्रमांकाच्या आधारे तपास पुढे सरकला. दहशतवादविरोधी पथक व पोलिस त्याच्या मांजरीतील घरी पोहोचले. त्यावेळी आरोपी पुणे रेल्वे स्थानकात पोहोचला होता. त्याने एका दुकानदाराच्या मोबाइलवर ऑनलाइन तीन हजार रुपये पाठवून स्वत:कडे रोख रक्कम घेतली. पोलिसांनी या व्यवहाराचाही तपासात उपयोग केला. तपासा दरम्यान आरोपीने कोलकाता येथील हावडा रेल्वे स्थानकाचे तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. तो नेपाळमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली.
हडपसरमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आढळलेल्या कथित बॉम्बप्रकरणी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) सुरुवातीच्या अहवालात संशयित वस्तूमध्ये तीन जिलेटीन कांड्या असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत त्या वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारच्या जिलेटीन कांड्या किंवा स्फोटक साहित्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ‘बीडीडीएस’ला संशयित वस्तूचे अचूक विश्लेषण करता आले नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) अशा घटनांची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) देणे अपेक्षित असताना पुणे पोलिसांनी ती दिली नसल्याचे समोर आले आहे. माध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर ‘एटीएस’ला या घटनेची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. ‘एटीएस’चे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ‘बीडीडीएस’ने वस्तू निकामी केली होती.‘एटीएस’कडे बॉम्बमधील स्फोटकांचे स्वरूप आणि त्यातील रासायनिक घटक तपासण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असतात. मात्र, त्यांची मदत न घेता पुणे पोलिसांनी घाईत कारवाई केल्याची चर्चा आता पोलिस दलातही सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ‘एसओपी’चे कथित उल्लंघन यावरून प्रशासनावर टीका होत आहे.

