
रोखठोक मराठी न्यूज
आळंदी, प्रतिनिधी : दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर आळंदी शहरातील कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या नियमपालनाबाबत प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आळंदी नगरपरिषदेकडून विविध संस्थांची तपासणी सुरू असून, आवश्यक परवानग्या नसल्याचे आढळून आल्याने विनर्स अकादमी या कोचिंग क्लासवर कारवाई करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. ही इमारत श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची असून, मालमत्ता क्रमांक जुना ११३७ व नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये अकादमीचे वर्ग सुरू असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
तपासणी दरम्यान संबंधित आस्थापनाने आळंदी नगरपरिषदेचा आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतल्याची कोणतीही नोंद नगरपरिषदेच्या अभिलेखांमध्ये आढळून आली नाही. त्यामुळे विद्यमान कायदे व नियमांच्या अधीन राहून आवश्यक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची इमारत सील करण्याची कारवाई केली.

या कारवाई दरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे ही कारवाई शांततेत आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडली.दिवेआगर दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेसकडून नियमांचे पालन केले जाते का, याची काटेकोर तपासणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे. परवाने, अग्निसुरक्षा उपाययोजना, इमारतींची वैधता तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाबींची पडताळणी केली जात आहे.नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरातील सर्व आस्थापनांनी आवश्यक परवानग्या घेऊनच व्यवसाय सुरू ठेवावा आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, विनर्स अकादमीवरील कारवाईमुळे शहरातील इतर कोचिंग क्लासेस व व्यावसायिक आस्थापनांमध्येही आवश्यक परवानग्या व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम आगामी काळात अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.