एकतानगर चौकात सीसीटीव्हीचा ‘वॉच’; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Spread the love

नगरसेवक रणजित जरे यांच्या पुढाकाराचे पोलिसांकडून कौतुक; चोरी व अपघातांच्या तपासाला मिळणार मदत

रोखठोक मराठी न्यूज,

चाकण (प्रतिनिधी) एकतानगर(चाकण) परिसरातील वाढत्या चोरीच्या घटना आणि वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी एकतानगर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक रणजित सखाराम जरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

एकतानगर चौक हा सतत वर्दळीचा परिसर असल्याने येथे नागरिकांची मोठी ये-जा असते. या परिसरात चोरीच्या घटना तसेच अपघातांचे प्रकार घडत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची गरज होती. ही गरज लक्षात घेऊन नगरसेवक रणजित जरे यांनी पुढाकार घेत चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चौकातील हालचालींवर सतत लक्ष ठेवणे शक्य होणार असून, चोरी किंवा अन्य गुन्ह्यांच्या घटनांमध्ये संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे. तसेच अपघातांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.पोलिसांकडून उपक्रमाचे स्वागतसीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या या उपक्रमाचे चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी स्वागत केले.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे महत्त्वाचे असून, सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगारीच्या घटनांचा तपास तसेच अपघातांच्या चौकशीमध्ये पोलिसांना निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी नगरसेवक रणजित जरे, विशाल नायकवाडी, प्रेम जगताप, समीरभाई सिकीलकर, कालिदास वाडेकर, शेखरनाना पिंगळे, अभिजीत जाधव, अमृतनाना शेवकरी, जमीरभाई काझी, प्रमोद टिळेकर, मुबिनभाई काझी, उमेश गोरे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे एकतानगर परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.

नागरिक आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयातून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपाययोजना प्रभावी ठरतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *