
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : चाकण एमआयडीसी परिसरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.


या आंदोलनात एमआयडीसीतील कामगार वर्गासह विद्यार्थी, महिला भगिनी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र आहे.चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आणि उद्योग असल्याने दररोज हजारो कामगारांची ये-जा होते. मात्र अपुरा रस्ता, वाढती वाहनसंख्या, अवजड वाहनांची वर्दळ आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक व कामगारांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय, इंधनाचा अतिरिक्त खर्च तसेच विद्यार्थ्यांना आणि महिला वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गणेश बोत्रे यांनी साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाला कामगारांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून, विद्यार्थ्यांनीही वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. महिला भगिनी आणि स्थानिक नागरिकांकडूनही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.“चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ कामगारांचा नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलनाला दिवसेंदिवस मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता चाकण एमआयडीसीच्या वाहतूक प्रश्नावर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.